सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)
रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल कामाची 2600 कोटींची मजुरी तर अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये केंद्र शासनाकडे थकीत होते. त्या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झालेली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असून तो निधी सोमवार 21 एप्रिलपासून प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील रोजगार हमी योजनाच्या कामांचा आढावा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्यासह आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.योजना राबवत असताना कामाविषयी तक्रारी होत असतात, परंतु अधिकार्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. अधिकार्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकर्यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत, अशा सूचनाही यावेळी गोगावले यांनी दिली.
प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू राहतील व मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीने संबंधित अधिकार्यांनी कामे केली पाहिजेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश गोगावले यांनी दिले.