सोलापूर, 9 सप्टेंबर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे इअर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर इअर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरे उचलून गोशाळेत सोडणार असल्याची मोहीम सोलापूर महापालिका आजपासून हाती घेणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
मोकाट जनावरांबाबत काल महापालिकेत बैठक झाली. नियंत्रण अधिकारी तपन डंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, सहायक पोलिस निरीक्षक सतीश दावणे आदी उपस्थित होते. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ. सचिन ओम्बासे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महापालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत बैठका घेऊन संबंधितांना पूर्व कल्पनाही देण्यात आली होती. जनावरांना इअर टॅगिंग महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. तरीही रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या संख्येवर नियंत्रण आले नाही. त्यामुळे आता जनावरे उचलून गोशाळेत सोडण्याची कारवाई केली जाणार आहे. संबंधित ठिकाणे निश्चित करून पोलिसांच्या मदतीने मोहीम राबवावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
