सोलापूर, ३० जुलै – मोहोळ तालुक्यातील वाळूज (दे) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ट्रॅक्टरजवळ ठेवलेली सुमारे १ लाख ७ हजार रुपयांची लोखंडी शेती अवजारे चोरीला गेल्याची घटना २४ ते २९ जुलै दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी राजकोटला असताना घटना घडली
शेतकरी नानासाहेब वाल्मिक मोटे यांची वाळूज शिवारात शेती आहे. २४ जुलै रोजी त्यांनी शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला आणि काम पूर्ण झाल्यानंतर लोखंडी नांगर, पंजीफाळ, सात दाती फन आणि रोटावेटर ही अवजारे ट्रॅक्टरजवळ ठेवून ते सायंकाळी घरी परतले. दुसऱ्या दिवशी ते राजकोट येथे ऊस क्रेन हार्वेस्टर घेण्यासाठी गेले आणि २९ जुलै रोजी परतले.
या दरम्यान, त्यांचा मुलगा रणवीर मोटे शेतात गेला असता त्याला ट्रॅक्टरजवळील अवजारे दिसली नाहीत. त्याने वडिलांना फोन करून विचारणा केली की, ही अवजारे कुणा शेजाऱ्याला दिली आहेत का? मात्र, नानासाहेब मोटे यांनी त्याला स्पष्ट केले की कोणालाही अवजारे दिली नाहीत.
शेजाऱ्यांकडेही चौकशी व्यर्थ
यानंतर रणवीरने शेजारील शेतकऱ्यांकडे चौकशी केली, परंतु कोणीही या अवजारांविषयी माहिती असल्याचे सांगितले नाही. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.