सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।
पोलिस कारवाईसाठी येत असल्याची खबर लागताच भरलेली वाळू नदीत टाकून पसार होणारे पाच ट्रॅक्टर, कार व दुचाकी आणि चार मोबाईल, असा एकूण ३९ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील बालाजी लक्ष्मण पवार व संजय पवार यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
परिविक्षाधिन अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. चिंचोली भोसे (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदी पात्रातून मध्यरात्री एक ते पहाटे पाच या वेळेत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे अवैध वाळू उपशावर आमचे सतत लक्ष असल्याचे पंढरपूर पोलिस सांगतात. तरीदेखील, परिविक्षाधिन अधिकारी अंजना कृष्णा यांना खबऱ्याकडून चिंचोली भोसे येथील भीमा नदीपात्रातून पहाटेच्या सुमारास वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली.