सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.)। गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. निधी उपलब्ध असतानाही या प्रकल्पाची गती मंदावली आहे. उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या. तर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही उड्डाणपुलाचे भूसंपादन १५ मे पर्यंत पूर्ण करण्यासाठीची मुदत दिली.
महापालिकेतील कार्यालयात आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहरातील दोन उड्डाणपुलाच्या कामासाठी मंगळवारी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोनवेळा निविदा प्रक्रिया राबविली आहे. परंतु, भूसंपादन पूर्ण न झाल्याने काम प्रलंबित आहे.शहरातील भविष्यातील वाहतूक कोंडीचा विचार करून २०१४ मध्ये जुना पूना नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकारभवन असे ११ कि.मी. अंतराचे दोन उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. दहा वर्षे झाले प्रकल्प कागदावर राहिले आहे. २०२१ मध्ये या दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाला गती आली होती. आता पुन्हा भूसंपादनाचे काम रखडले आहे. निधी असतानाही काम का रखडले? याबाबतचा आढावा आमदार देशमुख यांनी घेतला.