सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने बनावट निघाले आहे. त्यामुळे खातेदारांसह कर्जदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बनावट तारण सोन्याची व्याप्ती बँकेच्या अन्य शाखांमध्येही असल्याची चर्चा आहे. एकूणच या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निमगाव शाखेतील कर्जदारांनी तारण ठेवलेल्या सोन्यात काही सोने बनावट असल्याचे मुख्यालयातील अधिकार्यांना तपासणीत आढळल्याने बँकेच्या अधिकार्यांची झोप उडाली आहे. तर, कर्जदारांनी आपले खरे सोने गायब झाल्याने बँकेवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही तारणदारांनी एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षासाठी सोने तारण ठेवून बँकेकडून रक्कम घेतली आहे. त्यावेळी बँकेच्या सोनाराने सोने खरे असल्याची खात्री केल्यानंतरच बँकेने कर्ज दिले आहे. त्यामुळे आम्ही ठेवलेले सोने अचानक बनावट कसे झाले, असा सवाल कर्जदार व्यक्त करत आहेत.