सोलापूर, 4 ऑगस्ट – घरबसल्या वीजबिल भरण्याकडे महावितरणच्या ग्राहकांचा कल सातत्याने वाढत आहे. यामुळे बिल भरणा केंद्रांवर लांबलचक रांगा टाळल्या जात असून, ग्राहकांचा मौल्यवान वेळ आणि कष्ट वाचत आहेत. जिल्ह्यात दरमहा सव्वातीन लाखांपेक्षा जास्त ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पर्याय निवडत असून, हे प्रमाण एकूण ग्राहकांच्या सुमारे ७१ टक्के आहे.
महावितरणच्या वीज ग्राहकांना www.mahadiscom.com संकेतस्थळ व मोबाईल अॅपद्वारे कोणत्याही वेळी, कोठूनही वीजबिल भरता येते. बिल भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर लगेच पुष्टीकरण संदेश मिळतो. तसेच संकेतस्थळावर बिलाचा इतिहास, भरणा तपशील व पावती उपलब्ध होते.
जिल्ह्यातील ४,६०,४६२ ग्राहकांपैकी १,३२,६४४ ग्राहकांनी २१ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये ऑफलाइन भरले, तर ३,२७,८१८ ग्राहकांनी ८३ कोटी ७ लाख ५१ हजार रुपये ऑनलाइन भरले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही ऑनलाइन पेमेंटचा वापर वाढत असून, सोलापूर शहरात हे प्रमाण ७४.६१ टक्के आहे. ग्रामीण भागातील विभागांमध्ये हे प्रमाण ७१ ते ८४ टक्क्यांदरम्यान आहे.