सोलापूर, १६ ऑगस्ट – प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील १३४८ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम रविवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प, दहिटणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत असंघटित कामगारांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीत परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माणाचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या प्रकल्पात ५० इमारतींतून ३२७ चौ.फुटांच्या १२०० स्वयंपूर्ण सदनिका उभारल्या जात आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पातील ११२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहप्रकल्पात २५२ सदनिका बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी २२० सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे.