सोलापूर, 27 मे : सोलापूरच्या शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुंकुमार्चन कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या भक्तिभावपूर्ण सोहळ्याच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष उपक्रमासाठी सिंदूर संकलित करून तो सीमेवरील जवानांना पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमातून “आम्ही माता भगिनी तुमच्या पाठीशी आहोत” हा भावनिक संदेश भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता.
धार्मिक विधी व सामाजिक संदेशाचा संगम
कुंकुमार्चन विधीचे पौराहित्य संजय हंचाटे आणि वेदमूर्ती शिवशरण म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमावेळी श्री रामलिंग चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. काशिनाथ रुगे, सचिव गुरुनाथ निंबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवीच्या यात्रेचे आकर्षण ठरले धार्मिक कार्यक्रम
यात्रेच्या निमित्ताने पहाटे नवदांपत्यांच्या हस्ते श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीचा महारुद्राभिषेक व महाआरती करण्यात येणार आहे. तसेच सकाळी दहा वाजता सुहासिनींचा ओटी भरविण्याचा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूरच्या मातृशक्तीचा देशसेनेसाठी सलाम
या उपक्रमातून सोलापूरमधील महिलांनी देशसेनेसाठी आपली भावनिक नाळ जपली आहे. धार्मिक श्रद्धा आणि राष्ट्रसेवा यांचा संगम साधणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.