सोलापूर, 13 जुलै (हिं.स.) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील सर्व घटकातील पदाधिकाऱ्यांना सत्तेमध्ये स्थान दिले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तरीही लक्ष्मण हाके हे समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत. स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली.
उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, सरचिटणीस श्रीकांत शिंदे, जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, उपमुख्यंत्री अजित पवार यांनी संघटनेत काम करणाऱ्या लोकांना संधी दिली आहे. संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली पाहिजे.