सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर बाजार समितीची निवडणूक दोन्ही पॅनेलकडून प्रतिष्ठेची केली जात आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी हे सर्वपक्षीय महाआघाडीकडून विजयाच्या दृष्टीने विविध प्रमुखांशी संवाद साधत विजय आपलाच व्हावा या हेतूने सांगड घालत आहे. तर भाजपच्या पॅनेलकडून आ. सुभाष देशमुख मतभेद बाजूला सारून विविध प्रमुखांचे घर गाठत हितगुज करत आहे. दुसरीकडे प्रत्येक उमेदवार मात्र मतदारांचे दार ठोठावताना दिसत आहेत.
महाआघाडीचे कर्णधार म्हणून आ. कल्याणशेट्टी यांनी विविध स्तरावरील नेत्यांशी संवाद साधत विजयाचे गणित मांडत आहेत. त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही बाजार समिती ज्या पद्धतीने ताब्यात घेतल्या त्याचपद्धतीने सोलापूर बाजार समिती जिंकण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे आ. देशमुख यांनीही विधानसभेला ज्या पद्धतीने दणदणीत विजय मिळवला तसा विजय पुन्हा साकार करण्यासाठी मतभेद विसरत आ. विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते, जाफरताज पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची भेट घेऊन विजयासाठी जुळवाजुळव करत आहेत.