प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरचा पारा 43 अशांच्या पुढे गेलाय. नागरिकांची अक्षरश: होरपळ सुरु आहे. सूर्यनारायण कोपत असल्याने जीवाची काहिली होत आहे. असह्य उकाडा आणि उन्हाच्या झळांनी घामाराच्या धारा लागल्या आहेत. अशातच सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये दोन्ही पॅनलकडून प्रचाराचा वारा सुटला आहे. मात्र, प्रचारासाठी अवघे 8 दिवस असल्याने पॅनेल प्रमुखांसह उमेदवारांची मतदारांना भेटताना दमछाक होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान 27 एप्रिल 2025 रोजी होत आहे, मतदान बॅलेट पेपर वर होणार आहे. आठ दिवसच प्रचार साठी उरले असले तरी देखील मतदान स्थळ निश्चित नसल्याने मतपत्रिकांचा नमुना छापण्याला अडचण आहे. सध्या समाज माध्यमाचा आधार घेणे सुरू आहे. काही उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु झाला आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा आहे. पारा जवळपास 43 अंशाच्या पुढे गेला आहे. उन्हाचे चटके सहन करत, घाम गाळत गावोगावी भेट घेणे सुरू आहे.सोलापूर बाजार समितीचे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोटमधील राजकीय नेते,शेतकरी, व्यापरी यांचे वर्चस्व आहे. मागील अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेस व मित्र पक्षातील उत्तर मधील माजी आमदार दिलीप माने,दक्षिण मधील काँग्रेसचे नेते माजी संचालक सुरेश हसापुरे,अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे वर्चस्व होते.
यंदाच्या निवडणूकमध्ये भाजप अक्कलकोट – दक्षिण मतदार संघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे पॅनल असून त्यांना माजी आमदार दिलीप माने,काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे,माजी चेअरमन राजशेखर शिवदारे,माजी उपसभापती श्रीशैल नरोळे तर दुसर्या बाजूने दक्षिण- उत्तर सोलापूर भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोट चे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे,राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे,सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब शेळके सोबत आहेत.
संचालक मंडळची निवडणुकीत एकमेकांना चॅलेंज देण्याची तयारी सुरू आहे. उन्हाचा पारा वाढन्यापूर्वीच उमेदवार शेतकर्यांच्या बांधावर, ग्रामपंचायत, सोसायटीमधील सदस्य यांना प्रत्यक्ष जाऊन भेटी घेणे सुरू आहे. व्यापारी संघातील उमेदवार, हमाल-तोलार संघातील उमेदवार आपला प्रचार फेसबुक,व्हाट्सअपच्या साह्याने करत आहेत. सिद्धेशवर शेतकरी विकास व सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचे प्रमुख प्रचाराचे नियोजन करीत आहे.आपला मतदारसंघात विविध मतदाराचे मतदान कशा पद्धतीने होईल याचे नियोजन सुरू झाले आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये सुरेश हसापुरे,दिलीप माने, राजशेखर शिवदारे,आदी समोर देशमुख यांच्या पॅनलमधील मनीष देशमुख,रामप्पा चिवडशेट्टी, हविनाळे हे तगडे उमेदवार असून एकमेकांसमोर आव्हान आहे. उत्तर तसेच दक्षिण सोलापूरमधील सोसायटी व ग्रामपंचायतवर माने आणि हसापुरे यांचेच वर्चस्व आहे. तर दोन्ही देशमुख,साठे यांच्याकडे आकडेमोड करण्याइतक्या ग्रामपंचायती तसेच सोसायट्या आहेत.
म्हेत्रेंच्या पाठिंब्याचा कितीपत होऊ शकतो फायदा?
माजी आमदार म्हेत्रें यांच्याकडे अक्कलकोट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत व सोसायटीवर वर्चस्व असून त्यांच्याकडे दुधनी बाजर समितीदेखील असून शेतकरी, व्यापारी यांचा फायदा होऊ शकतो.दोन्ही पॅनलमधील व्यापारी हमाल, तोलार यांचे मतदान कोणत्या मुद्यांवर होणार हा ‘कळी’चा मुद्दा होऊ शकतो. परिवर्तन पॅनल मधून व्यापारी हमाल तोलार संघातील उमेदवाराची घोषणा झाली नसल्याचे समजते आहे.मागच्या निवडणुकीवेळी होते असे नियोजन मतदान केंद्र अंतिम झाल्याशिवाय मतपत्रिका छापता येत नाही.मागील नियोजनानुसार, सोसायटी व ग्रामपंचायत मतदान हे स्थानिक स्तरावरील गावातच तर हमाल – तोलार व व्यापारी संघासाठी सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात आले होते.
कोट स्वरुपात
ज्या ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करायचे आहे, त्या ठिकाणच्या प्रमुखाशी सोमवारी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा झाल्यावरच मतदान केंद्र फायनल करण्यात येणार आहे.
-किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर