सोलापूर/प्रतिनिधी
राज्यातील विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी दुसर्या स्थानावर असलेल्या सोलापूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे दीड वर्षापासून भिजत पडलेले घोंगडे अखेर वाळण्याच्या मार्गावर आले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 27 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या तीन आमदारांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या नरडीला नख लावून, प्रशासनातील खादाड खाऊ अधिकारी आणि कर्मचारी तसेच अडतदार तसेच व्यापारी यांना पुसत बाजार समितीला ओरडून खाण्यासाठी पांढरे बगळे आता निवडणुकीच्या निमित्ताने मैदानात उतरणार आहेत. बाजार समितीत स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी आसुसलेल्या इच्छुकांना आता संधी आली आहे.
बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक पैलवानांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनेलमध्येच निवडणूक झाली होती. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माने यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे भाजप विरूद्ध भाजप असेच पाहिले गेले.जून 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत दिलीप माने यांच्या पॅनेलला एक हाती सत्ता मिळाली होती. आ. विजयकुमार देशमुख यांनी सभापतीपद मिळवले होते. त्यानंतर आता बाजार समितीच्या आखाड्यात सात वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. गतवेळी दोन्ही देशमुख मंत्री होते. आता दोन्ही देशमुख आमदार आहेत. यंदा बाजरा समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अधिकच इंटरेस्ट घेतला आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांची भूमिका काय असणार याची उत्सुकता आहे.
गतवेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिद्धाराम म्हेत्रे यांच्या रूपाने कॉंग्रेसचा एकमेव आमदार बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. गतवेळी निवडणुकीत शेतकर्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारातून बाजार समितीची निवडणूक झाली. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेकांचा बाजार समितीत प्रवेश झाला होता. यंदाची निवडणूक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांमधून होणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सहकारात माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे ग्रामपंचायत व सोसायटीच्या मतदारांची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे या दोघांचा कौल कोणाकडे? यावर देखील बाजार समितीचे राजकीय भवित्यव अवलंबून आहे.
खासदार प्रणिती शिंदे समोर तगडे आव्हान
आमदारकीच तिकीट न मिळाल्याने दिलीप माने,तर हसापुरे हे देखील भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. उत्तर आणि दक्षिणचे वर्चस्व बाजार समितीवर आहे. यातच दोन्ही आमदार देशमुखांच्या जोडीला आता अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी यांनीही निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत.
विधानसभा निवडउणुकीपासून दिलीप माने आणि आ. सुभाष देशमुख यांच्यातील कटुता कमी झाली आहे. तसे पाहता बाजार समितीवर दिलीप माने यांचे वर्चस्व आहे. मागच्यावेळी आ. सुभाष देशमुख गटाला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. यंदाची निवडणूक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांमधून होणार आहे. त्यामुळे भाजपाची ताकद बाजार समिती निवडणुकीत नगण्य असणार आहे. त्यामुळे आ. देशमुख आणि माने यांनी मनावर घेतले तर ही निवडणूक बिनविरोधही होण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.