सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)।
मर्यादित उत्पन्न असलेल्या सोलापूर महापालिकेचा आगामी २०२५-२६ वर्षाचा कोणतीही कर वा दरवाढ नसलेला एकूण १२९३ कोटी ३० लाख १३ हजार ४०१ रुपयांचा अर्थसंकल्प पालिका प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांनी मांडला. हा अर्थसंकल्प प्रशासनाच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
या अर्थसंकल्पातून आस्थापनेवरील खर्च आखून दिलेली मर्यादा ओलांडत ४३ टक्क्यांवर गेल्याचे दिसून येते. दोन लाख ५७ हजार ४०१ रुपये शिल्लक दर्शविणाऱ्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजूने महसुली विभागासह पाणीपुरवठा आणि भांडवली विभाग मिळून एकूण ७७३ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये दर्शविण्यात आले आहेत. तसेच शासन अनुदान ४२३ कोटी ५३ हजार आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, मलनिःसारण योजनेचा पालिकेचा हिस्सा कर्ज ९६ कोटी ६१ लाख गृहीत धरण्यात आले आहेत. महसुली जमेमध्ये ५८५ कोटी १७ लाख २९ हजार, पाणीपुरवठ्यात १२८ कोटी २८ लाख २७ हजार आणि भांडवलीमध्ये ५९ कोटी ६८ लाख रुपयांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.