सोलापूर, 12 सप्टेंबर। महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या ई-शिधापत्रिकेची सुविधा पूर्णतः नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून पब्लिक लॉगिनद्वारे अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आधार आधारित ओटीपी वापरून स्वतःचे लॉगिन आयडी तयार करता येते.
पुरवठा कार्यालयात ई-शिधापत्रिका संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रवेशद्वारावर मार्गदर्शक छायाचित्रित प्रिंट लावण्यात आलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल. ज्या शिधापत्रिकांमध्ये कुटुंबप्रमुख अद्ययावत नसतील, अशा प्रकरणांमध्ये कार्यालयीन लॉगिनद्वारे कार्यवाही करण्यात येते.
नागरिकांनी ही कामे कोणत्याही एजंटकडे न देता स्वतःच वरील संकेतस्थळावरून पब्लिक लॉगिनचा वापर करून विनामूल्य करावीत. नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज, नाव वाढविणे, कमी करणे, नावात दुरुस्ती, ई-शिधापत्रिकेची प्रिंट काढणे या सोयी उपलब्ध आहे.