सोलापूर, 3 जून, (हिं.स.)। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी सुरू झाली असून त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांच्या आवडी-निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात, यासाठी प्रत्येक उच्च महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तर, प्राध्यापकांची हजेरी क्लास रूममध्ये बायोमेट्रिकद्वारे नोंदविली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ उच्च महाविद्यालये असून विद्यापीठात ३७ विभागांची ११ संकुले आहेत. त्याअंतर्गत ७० हजारांवर विद्यार्थी प्रवेशित आहेत.
विद्यापीठाच्या संकुलातील विद्यार्थ्यांची संख्या चार हजारांवर आहेत. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे नियमित तास होतात, पण त्यासाठी विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. जेणेकरून दररोज सर्व विषयांचे तास होतात का ?, त्यासाठी किती विद्यार्थी उपस्थित राहतात ? हे विद्यापीठासह त्या-त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना समजणार आहे. दुसरीकडे प्राध्यापकांची हजेरी त्यांच्या क्लासरूममध्ये नोंदविली जाणार आहे.