सोलापूर, २१ ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कारवाईत महत्त्वाचे यश मिळाले असून, एप्रिल २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत एकूण १५१ बालविवाह रोखण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे मिळालेल्या तक्रारींवर आधारित ही कारवाई करण्यात आली.
करमाळा, मोहोळ, अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुक्यांत बालविवाहाचे प्रमाण विशेषतः जास्त आढळले. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, यासाठी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येऊ शकतात. केवळ वर किंवा वधूच नव्हे, तर या विवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींना या गुन्ह्यात दोषी धरले जाऊ शकते.
बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी सततच्या जागरूकता मोहिमा आणि समुदायातील सहकार्यामुळे हे यश मिळवले असल्याचे सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की समाजातील जागरूकतेमुळेच अशा गुन्ह्यांवर मात करणे शक्य आहे.