सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २० एप्रिल रोजी सोलापूर शहरातून विविध उत्सव मंडळाकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख तीन वाहतूक मार्ग वाहतुकीसाठी त्या दिवशी बंद ठेवले जाणार आहेत. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे.
मिरवणुकीच्या दिवशी (२० एप्रिल) हैदराबाद, तुळजापूर-पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक-महावीर चौक-गुरूनानक चौक-संत तुकाराम चौक-अशोक चौक-शांती चौक-जुना बोरामणी नाका चौकातून मार्केट यार्ड हा मार्ग वापरता येईल. तर, मंगळवेढ्याकडून होटगी रोड व विजयपूर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मरिआई चौक-नागोबा मंदिर-रामवाडी पोलिस चौकी-मोदी बोगदा-पत्रकार भवनपासून पुढे जाता येईल.
जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुना नाका-जुना कांरबा नाका-जुना तुळजापूर नाका-बोरामणी नाका-शांती चौक-रंगभवन-सातरस्ता-मोदी पोलिस चौकी-मोदी बोगदा-रामवाडी दवाखाना-रामवाडी पोलिस चौकी-रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका-नवीन केगाव बायपासमार्गे देगाव नाक्याकडून मरिआई चौक-नागोबा मंदिर ते रेल्वे स्टेशन हा मार्ग उपलब्ध असणार आहे.
