सोलापूर, 12 सप्टेंबर। उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्री बाराच्या सुमारास चालू झालेला पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत पडत होता. केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या पर्जन्यमापकात या पावसाची ६५ मिलिमीटर इतकी नोंद झाली. या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीस आलेला उडीद, सोयाबीन लागण केलेल्या कांदा रोपांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या बाणेगाव, भोगाव, मार्डी, कोंडी, हिरज या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोंडी येथील शेतकऱ्याच्या स्वयंचलित पर्जन्यमापकात या पावसाची ६४ मिलिमीटर तर बाणेगाव येथील पाणी फाउंडेशनचे जलमित्र अमोल पांढरे यांच्या पर्जन्यमापकात या पावसाची नोंद ६६ मिलिमीटर इतकी झाली.
बीबीदारफळ येथे ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे काढणी सुरू असलेला उडीद पाण्याखाली गेला. चार दिवसाच्या उघडीपी मुळे शेतकऱ्यांची उडीद काढण्याची लगबग सुरू होती. मात्र अचानक पडलेल्या या जोरदार पावसामुळे उडीद भिजून गेला. तालुक्यातील कळमन, गावडी दारफळ या परिसरात मात्र अवघा एक मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे.