नवी दिल्ली, 8 ऑगस्ट – सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 11 व्या राष्ट्रीय हातकरघा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
1962 मध्ये सोलापूर येथे जन्मलेले अंकम गेली 48 वर्षे पारंपारिक विनकर म्हणून हातमाग कला जोपासत आहेत. वडिलांकडून विणकामाचे कौशल्य आत्मसात करून त्यांनी सुमारे 100 विणकरांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरच्या हातमाग उद्योगाला नवे आयाम मिळाले आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळाली.
स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ आणि हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात 24 उत्कृष्ट कारागिरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये 6 महिला आणि 1 दिव्यांग कारागीरांचा समावेश होता. कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया, खासदार कंगना रनौत, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव, अतिरिक्त सचिव रोहित कंसल, हातकरघा आयुक्त डॉ. एम. बीना आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरिराज सिंह यांनी हातमाग क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मिती क्षेत्र असल्याचे सांगत, डिझायनर्स आणि विणकरांनी एकत्र येऊन तरुणांना आकर्षित करणारी आधुनिक हातमाग उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले. यावेळी हातमाग प्रदर्शन, ‘वस्त्र वेदा’ फॅशन शो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबईच्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही झाले.