सोलापूर, 3 मे (हिं.स.)
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या परंतु ऊस क्षेत्रात नंबर एकवर असलेल्या सोलापुरात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तप्त उन्हाच्या झळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते निर्मनुष्य बनले होते.
यंदा एप्रिल महिन्यांपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून तापमान 40 अंशांपुढेच राहिले आहे. उन्हाळा सोलापूरकरांसाठी त्रासदायक ठरला आहे. सलग दुसर्या दिवशी 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमान ठरले.
सध्या लग्नसराई असल्याने विवाह सोहळे, लग्नासाठी बस्ता व अन्य साहित्य खरेदीसाठी नेहमीच सराफ कट्टा, कुंभार वेस, मधला मारुती, विजयपूर रोड, मंगळवार पेठ, विजापूर वेस यासह अन्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी असते. परंतु, दुपारी वाहणार्या उष्णतेच्या झळांमुळे नागरिकांनी खरेदीसह अन्य कामांसाठी बाहेर न पडता घरातच थांबणे पसंत केले.