सोलापूर, 12 सप्टेंबर। सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करून सुमारे तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाघमोडे वस्ती, सावे (ता. सांगोला) परिसरात करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल जालिंदर टाकळे (वय ४२, रा. लक्ष्मीदहीवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच १३, एएक्स ७३६१) शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता माण नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना आढळून आला. वाहनाच्या मागील हौदात तब्बल एक ब्रास वाळू भरलेली आढळली.
या कारवाईत वाळूसह वाहन असा एकूण सुमारे तीन लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पर्यावरणाचे नुकसान करून स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम रसूल नदाफ यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.