सोलापूर, 4 सप्टेंबर : कर्नाटकातील देवरनिंबर्गी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील ग्रामपंचायत सरपंचाची डोळ्यांत चटणी पूड टाकून व गावठी पिस्तुलातून तीन – चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आज सकाळी गावातील हेअर कटिंग सलुनमध्ये ही घटना घडली. भिमनगौडा कल्लणगौडा बिरादार (वय ४०) असे सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसीम बशीर मनियार, रजिउल्ला नबिशा मकानदार, मौलासाब लाडलेसाब बोरगी, फिरोज रमजान अवराद (रा. देवरनिंबर्गी) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी मृत सरपंच भिमनगौडा यांची पत्नी राजश्री बिरादार (वय ३५, रा. देवरनिंबर्गी) यांनी फिर्याद दिली आहे. २०२३ मध्ये सरकारी कामातून जाकिर बशीर मनियार याने ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्याशी भांडण केले होते. याप्रकरणी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीप्रकरणी तो कारागृहात जाऊन आला होता. त्या प्रकरणाच्या रागातून जाकिर याचा भाऊ वसीम याच्यासह संशयितांनी शिवीगाळ करीत पीडीओ राठोडला पुढे करून माझ्या भावाविरुद्ध केस करून त्याला जेलला पाठवला, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सकाळी सरपंच भिमनगौडा हे गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी याच्या हेअर कटिंग सलूनमध्ये गेले होते.तेव्हा संशयितांसह काहीनी शिवीगाळ करीत तू इथे सापडला आहे, आता खलास करू म्हणत त्यांच्या डोळ्यांत चटणी पूड टाकून, ते चेहऱ्याला फासून त्यांच्या डोके व छातीवर पिस्तुलातून तीन – चार गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी विजयपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री साडेसातच्या सुमारास गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.