सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।
एसटी बस प्रवासात सवलत मिळावी म्हणून अडीच हजार रुपयांत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या तरूणास शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संगमेश्वर मल्लिकार्जुन अळगुडगी (वय ३७, रा. कर्णिक नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
संशयित आरोपी संगमेश्वर अळगुडगी हा एसटी महामंडळात कंत्राटी चालक म्हणून काम करतो. त्याचे वडील लहानपणीच मयत झाले असून आईने त्याचा सांभाळ केला आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी तो कंत्राटी चालक म्हणून एसटी महामंडळात नोकरीला लागला होता. एसटी प्रवासात कोणी जास्त दिव्यांग प्रमाणपत्र पहात नाही, अशा दिव्यांग बनावट प्रमाणपत्रावर बस प्रवासात सवलत मिळते म्हणून त्याने अडीच हजार रुपयांत मोबाईलवरुन बनावट प्रमाणपत्र बनवून द्यायला सुरवात केली,
अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. तो ४० टक्के, ५० टक्के दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन देत होता. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करुन देण्यात आणखी कोणी आहेत का, अशा बाबींचा तपास सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.