प्रतिनिधी
सोलापूर
कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत पुरुष गटातील सलामीच्या सामन्यात सोलापूरने सांगलीला बरोबरीत रोखले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयच्या वतीने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक 21च्या मैदानावर सोमवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात मध्यंतराच्या 14-15 अशा पिछाडीवरून सोलापूरच्या खेळाडूंनी बहारदार खेळी करीत 26-26 अशी बरोबरी केली.
सांगलीकडून अभिषेक केरीपाळे याने आपल्या धारदार आक्रमणात तब्बल दहा गडी बाद करीत 1.30 मिनिटे संरक्षण करीत अष्टपैलू खेळी केली. सत्यजित सावंतने 1.40 व 1.00 मिनिटे संरक्षण केले. सागर गायकवाडनेही 4 गडी टिपले. सोलापूरच्या अजय कश्यपने आपल्या धारदार आक्रमणात 7 बळी व 1.00 मिनिटे पळती तर जुबेर शेख याने 4 गडी बाद केले. अक्षय इंगळे (1.10, 1.10 मिनिटे संरक्षण व 3 गुण), सौरभ चव्हाण (1.00,1.00 व 1.10 मिनिटे व 3 गुण) व अमोल केदार (3 गुण) यांनी संघाच्या बरोबरीत साथ दिली.
नागपूरची किशोर व पुरुष गटात कडवी लढतकिशोरी गटात मध्यंतराच्या 3-3 अशा बरोबरीनंतर सोलापूरने नागपूरला 10-8 असे 2 गुण दीड मिनिटे राखून नमविले. ऋतुजा सुरवसे हिने पहिल्या डावात तब्बल 5 मिनिटे संरक्षण करीत नागपूरचे संरक्षण खिळखिळे केले. सोलापूरची कर्णधार सृष्टी काळे हिने 4 गडी बाद करीत संघाच्या विजयात साथ दिली. दुसऱ्या डावात कार्तिकी यलमार व मालन राठोड या दोघींनी प्रत्येकी 2.30 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. नागपूरकडून ठाकरे हिने (2.20 मिनिटे व 2 गुण) व दुर्गा धारवाडे हिने (2.10, 1.00 मिनिटे) यांनी लढत दिली.
पुरुष गटातील चुरशीच्या सामन्यात पुण्याविरुद्ध नागपूरने मध्यंतरापर्यंत कडवी लढत दिली. 10-9 अशा एका गुणाच्या आघाडीवरून पुण्याने नागपूरला 24-16 असे 8 गुणांनी हरविले. पुण्याकडून अनिकेत चिखले (2.00, 1.30 मिनिटे व 2 गुण), शिवम शिंगाडे 1.50, 1.50 मिनिटे) व रितेश कडगी (6 गुण) यांनी संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली. नागपूरच्या कोमल महाजन (2.00 मि. व 4 गुण), पियूष नांदूरकर (1.00 मिनिटे व 3 गुण) याने एकाकी लढत दिली. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले
अन्य निकाल ः किशोर ः धाराशिव विजयी विरुद्ध नागपूर 17-6 एक डावाने. कोल्हापूर वि. वि. बुलढाणा 19-7 एक डाव 12 गुणांनी.
किशोरी ः सांगली वि. वि. बुलढाणा 13-9 एक डाव 4 गुणानी.
महिला ः पुणे वि. वि.नागपूर 18-9 एक डाव 9 गुणांनी, नाशिक वि. वि. रत्नागिरी 13-10 एक डाव 3 गुणांनी, ठाणे वि. वि. अकोला 17-10 एक डाव 7 गुणांनी