सोलापूर, 9 सप्टेंबर : सोलापूर येथील संभाव्य आयटी पार्कसाठी काय धोरण असावे याबाबत अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय पथक या आठवड्यात मैसूर, भुवनेश्वर, इंदूरला जाणार आहे. त्यानंतर आयटी पार्कसाठी सर्वोत्तम धोरण ठरवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
आयटी पार्कसाठी हिरज, कोंडी, कुंभारी, एन जी मिल, होटगी येथील जागांची पाहणी झाली आहे. यातील एक जागा निश्चितीसाठी 20 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून, 30 सप्टेंबर रोजी जागेविषयी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.होटगीनजीक सिद्धेश्वर कारखानालगत 60 एकर जागेचा पर्याय आहे. परंतु या जागेवर 30 ते 38 मीटरपेक्षा जास्त उंच बांधकाम केल्यास विमान लँडिंगला अडचण येऊ शकते. एनजी मिलची जागा 30 एकर असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार याठिकाणी केवळ 60 टक्के जागेवर बांधकाम करता येते. त्यामुळे 15 एकरावर आयटी पार्क सुरू करण्यावर मर्यादा आहे.