सोलापूर, 9 मे, (हिं.स.) सोलापूर शहर व परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४४.१ व ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १ व २ मे रोजी झाली होती. आठवड्यातच सोलापूरच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. आज सोलापुरात ३६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आठवड्यातच सोलापूरच्या तापमानात जवळपास ८.१ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. तापमानाचा पारा घटला असला तरीही आर्द्रतेचा टक्का मात्र वाढला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा आठवडा कमी तापमानाचा, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा राहिला आहे. आज सोलापुरात दुपारी ४ च्या सुमारास अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. आज सकाळपासून कधी कडक उन्ह तर कधी ढगाळ वातावरण, असे संमिश्र वातावरण होते. दुपारी १२ ते ३ च्या सुमारास उन्हाचा प्रचंड कडाका होता. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण झाले होते.
—————