सोलापूर, 26 मे, (हिं.स.)। विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटीपूजेची सांगता १३ जूनला होणार आहे. या पूजेतून विठ्ठल मंदिर समितीला १४ लाखांचे उत्पन्न मिळाले असून या पूजेसाठी ५३ किलो सुगंधी चंदनाचा वापर करण्यात आला आहे. मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. परंतु यावर्षी १३ जून हा शुभ दिवस असल्याने या दिवशी चंदन उटी पूजेची विधीवत सांगता केली जाणार जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून विठ्ठल रुक्मिणीचे संरक्षण व्हावे, शिवाय उष्णतेचा दाह कमी होऊन देवाला थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. देवाची चंदन उटी पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी मागणी असते. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग केले जाते. या दिवसापासून चंदन उटी पूजा सुरू झाली. साधारण मृग नक्षत्रापर्यंत पूजा केली जाते. या दरम्यान शुभदिवस पाहून पूजेची सांगता केली जाते. यावर्षी १३ जून हा शुभ दिवस असल्याने अधिकचे पाच दिवस चंदन उटी पूजा केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना पूजेचा लाभ मिळणार आहे.
—————