सोलापूर : “तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा”,म्हणत जयंत पाटलांनी शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला जणू होकारच दिला. कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच शेख यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे तौफिक पैलवान आता हातातील पतंग सोडून हातावर घड्याळ बांधणार आहेत, असे बोलले जात आहे. मात्र थेट प्रवेशाबद्दल बोलण्यास दोन्ही पक्षातील नेत्यांनी नकार दिला.
सोलापूर एमआयएमचे नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष तौफिक शेख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तौफिक शेख यांनी एमआएमच्या सात नगरसेवकांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून शेख एमआयएमला रामराम करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता तर थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच शेख यांना सूचक इशारा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल रविवारी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जून तौफिक शेख यांची भेट घेतली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्यासह सात नगरसेवकांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना असल्याचं जाहीर केलं.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी तौफिक शेख यांचे आभार व्यक्त केले. तसेच “कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा” असे म्हणत शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला जणू होकारच दिला. मात्र थेट प्रवेशाबद्दल बोलण्यास दोन्ही पक्षातील नेत्यांनी नकार दिला.