सोलापूर – शहरातील एमआयडीसी परिसरातील सुनीलनगर भागात जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चंद्रशेखर नारायण दोन्तुल (वय 42) आणि गंगाधर ताटी (वय 40) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात बदलण्याचे काम दोघांनी घेतले होते. दुपारच्या सुमारास काम सुरू असताना एमएसईबीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना सिव्हिल रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.