सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २२ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपासून घेण्याचा निर्णय झाला आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून या सत्र परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थीहिताचा विचार करून विद्यापीठाने विलंब शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, लॉ या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म २४ एप्रिलपर्यंत भरून विद्यापीठाला सादर करायचे आहेत. त्यानंतर विद्यापीठाकडून संबंधित विद्यार्थ्यांना ई-मेलवर हॉल तिकीट पाठविली जाणार आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने विद्यापीठाने प्रश्नपत्रिका यापूर्वीच तयार केल्या आहेत.
आता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेले अर्ज महाविद्यालयांनी वेळेत विद्यापीठाला पाठविणे आवश्यक आहे. दरम्यान, अभियांत्रिकीची परीक्षा १० मेपासून सुरू होण्याची शक्यता असून त्यांचे वेळापत्रक अजून अंतिम झालेले नाही. परीक्षा ४० ते ४५ दिवसांत संपवून विद्यापीठाला वेळेत निकाल लावावा लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी अडचणी येणार नाहीत.