सोलापूर, 14 सप्टेंबर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरपासून सुरू होणारी विद्यापीठाची नियोजित परीक्षा आता १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
विद्यापीठाने नवे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सुरवातीला बीए, बीकॉम, बीएससी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा होईल. सर्वात शेवटी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभियांत्रिकीची परीक्षा सुरू होईल.
युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, दोन सत्रातील ९० दिवसांचा निकष पूर्ण व्हावा असा त्यामागील हेतू आहे. २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन करीत विद्यापीठाने वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते.