सोलापूर, १६ ऑगस्ट – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेल्या ‘कॅरिऑन’च्या निर्णयानुसार आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी याबाबत माहिती दिली.
पूर्वी पहिल्या वर्षात काही विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेत असले तरी, तिसऱ्या वर्षात जाण्यासाठी पहिल्या वर्षातील सर्व विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. या अटीमुळे अनेक विद्यार्थी अडकून राहत होते. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने समिती स्थापन केली होती.
ही समिती डॉ. शशिकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होती. त्यात डॉ. हणमंत आवताडे, डॉ. सोनाली गायकवाड, डॉ. प्रशांत पवार आणि विद्यापीठाचे कायदा अधिकारी जावेद खैरादी यांचा समावेश होता. समितीच्या अहवालानंतरच कॅरिऑनचा निर्णय घेण्यात आला आहे.