सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू झाली आहे. मात्र, परीक्षा फॉर्म भरायला दिलेल्या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चुकीमुळे तर काहींना स्वत:च्या चुकीमुळे अर्ज करता आला नाही. त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. परीक्षा सुरू असताना परीक्षा फॉर्म भरता येतो हा विद्यापीठाचा नवा नियम यातून समोर आला आहे.
विद्यापीठाने अंतिम सत्र परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू करण्याचे पहिल्यांदा नियोजन केले होते. पण मागच्याच परीक्षांचे निकाल विलंबाने लागले आणि अनेक महाविद्यालयांचा अभ्यासक्रम देखील शिकवून पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे विद्यापीठाने आठ दिवस परीक्षा पुढे ढकलली आणि ३० एप्रिलपासून ती घेण्याचे नियोजन निश्चित झाले. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत दिली, पण पहिले काही दिवस लिंक बंद होती. खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी विलंब शुल्क नसल्याने मुदतीत अर्ज केले नाहीत, अनेकांना वैयक्तिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. त्यासंदर्भात अनेकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या होत्या.