पुणे, 17 मे (हिं.स.)। बदलत्या काळात सौर उर्जेकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सौर उर्जेवर शेतीपंप चालावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील आठ लाख शेतकर्यांना सौर ऊर्जा पंप देण्यासाठी 24 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे वीज बिल कमी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती तालुक्यातील मुढाळे येथे महापारेषण कंपनीकडून 220 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.
लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली आहे. आता आम्ही या योजनेवर महिलांना कर्ज देणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सौर उर्जेचा वापर वाढण्याची आता गरज आहे. 1 लाख 30 हजार घरांसाठी 500 मॅगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पंप शासनाने बसवले आहेत.
येणार्या काळात राज्यातील ग्राहकांचे 70 टक्के वीज बिल टप्प्या-टप्प्याने कमी होईल. यातील काही अभ्यासू तांत्रिक लोकांनी तर वीज बिल शून्यावर येईल असेही आम्हाला सांगितले आहे. पण, मी तो दावा करणार नाही, शून्यावर आले नाही तर लोक मला थापा मारतोय असे म्हणतील.