सोलापूर, 26 जुलै – सोलापूर जिल्ह्यात एकूण 1688 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित होणार आहे. हे प्रकल्प 242 उपकेंद्रांद्वारे राबवले जाणार आहेत. यातील काही प्रकल्पांची कामे सध्या प्रगत अवस्थेत आहेत.
सध्या 45 उपकेंद्रांसाठी उपलब्ध 50 जागांवर 279 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प सुरू असून, या कामांना आणखी गती देण्यासाठी स्थानिक सहभाग आणि लोकसंवाद वाढवण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची आढावा बैठक
सोलापूर येथील नियोजन भवनात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत लोकेश चंद्र यांनी योजना राबविण्यातील प्रगतीचा आढावा घेतला व कार्यात गती येण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, असे निर्देश दिले.
बैठकीस उपस्थित अधिकारी
बैठकीस प्रकल्प संचालक सचिन तालेवार, प्रकल्प कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर, श्रीकांत जलतारे, सुनील काकडे, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, निवासी जिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक डी. बी. भित्तडे, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे, तसेच सहाय्यक विद्युत निरीक्षक व. नि. सुतार उपस्थित होते.