नवी दिल्ली, 12 सप्टेंबर । नेपाळमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोकांच्या मनात भारतात नेपाळसारखे अराजक घडवण्याचा डाव आहे. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीच्या दौऱ्यावर होते. शपथविधीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला होता. पत्रकारांनी याविषयी प्रश्न करताच शिंदे यांनी उत्तर देताना भारतात असे काहीही शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करणे फार दुर्दैवी आहे. प्रत्येकाला देशाप्रती स्वाभिमान, अभिमान असला पाहिजे. देशभक्त व देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचे विधान करू शकत नाहीत. काही लोकांच्या मनात नेपाळसारखे अराजक किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा डाव असू शकतो. त्यामुळे तसे कारस्थान कुणी रचत नाही ना ” असा प्रश्न उभा राहत आहे.
भारतीय लोकशाही पद्धती अत्यंत प्रगल्भ आहे. अतिशय मजबूत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहिले. त्यामुळे भारतात अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधीही होणे शक्य नाही. काही लोक आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्याचे काम करत आहेत. कारण, लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतांमधून निवडून येता येत नाही. त्यामुळे त्यांची अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची इच्छा आहे का? हा देखील विचार करण्याची आवश्यक्ता आहे. त्यामुळे देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे शिंदे म्हणाले.