प्रतिनिधी
सांगोला -एसटी न थांबल्याच्या कारणावरून प्रवाशाने दुचाकीने पाठलाग करीत ड्रायव्हरला मारहाण करून शासकीय कामात अडथळा केला. ही घटना जवळा (ता.सांगोला) येथील पाटील वस्तीजवळ रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगोल्याच्या पोलिसांनी पृथ्वीराज प्रशांत देशमुख (रा. देशमुखवस्ती जवळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात सचिन पोपट गुदगे या एसटी ड्रायव्हरने पोलिसात फिर्याद दाखल केली. ते रविवारी सकाळी एसटी घेऊन निघाले होते. जवळा येथील पाटील वस्तीजवळ त्यांनी बस थांबवली नाही. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख याने दुचाकीने एसटीचा पाठलाग केला. आणि वाटेत एसटी अडवून त्यांना मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार बोराटे पुढील तपास करीत आहेत.