धुळे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून धुळे बस आगारातून आज बससेवा सुरू करण्यात आली. मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही 4 बसेसवर दगडफेक झाली आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळत असून संप आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या मागणीसाठी धुळ्यातील एसटी कर्मचारी जवळपास 14 दिवसांपासून आगारामध्ये संपावर आहेत.
सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू करण्यात न आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बससेवा सुरू केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धुळे एसटी आगारातून एसटी बस बाहेर पडत असताना आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बघावयास मिळाला.
या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तरीही त्यात चार एसटीवर दगडफेक झाली. धुळे आगारातून 14 बसेस सोडण्यात आल्या. मात्र, 4 बसेसवर दगडफेकीच्या अप्रिय घटना घडली.बसेस मार्गस्थ होत असताना 4 बसेसना लक्ष्य करण्यात आलं. अज्ञातांकडून बसेसवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यानं पोलिसांची धावपळ उडाली. यात एक एसटी कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश सुरू असताना एसटी प्रशासनातर्फे बस आगारातून बाहेर काढण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला मनसेतर्फे पाठिंबा देण्यात आला व बस बाहेर काढत असताना मनसेतर्फे विरोध देखील करण्यात आला. परंतु पोलिस प्रशासनातर्फे मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तमध्ये धुळे एसटी आगारातून बसेस बाहेर काढण्यात आल्या आहेत.