मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतीची घोषणा
लखनऊ, 28 जुलै :
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात श्रावण सोमवारी अवसानेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जमलेल्या भाविकांमध्ये मोठी भगदड झाली. विजेचा तारा तुटून मंदिराच्या टिनशेडवर पडल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत २ भाविकांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत.
घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि चेंगराचेंगरी झाली. ही घटना रविवारी मध्यरात्री २ वाजता घडली. मृतांमध्ये मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय प्रशांत याचा समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर तातडीने योग्य उपचार करण्यात यावेत, असे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.
अपघाताचे कारण :
जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की, विजेच्या तारांवर एका माकडाने उडी मारल्याने तारा तुटून टिनशेडवर पडली. यामुळे विजेचा प्रवाह पसरला आणि गर्दीत गोंधळ निर्माण होऊन भगदड उडाली.
दुर्घटनेनंतर त्रिवेदीगंज आणि हैदरगड सीएचसी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
-
त्रिवेदीगंजमध्ये १० जखमी दाखल असून, त्यातील ५ जण गंभीर आहेत.
-
हैदरगडमध्ये २६ जणांवर उपचार सुरू असून, काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रशासनाची तत्काळ कारवाई :
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून विजेच्या तारा व सुरक्षेच्या दृष्टीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.