पुणे, ५ ऑगस्ट – पुणे शहरातील लक्ष्मी रस्ता व इतर मार्गांवरील गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसात वाजता सुरू करावी, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांनी केली आहे. या मागणीसंदर्भात मानाच्या गणपती मंडळांशी लवकरच चर्चा होणार आहे.
मंडळांनी स्पष्ट केले की, मुख्य मिरवणूक नेहमीप्रमाणे वेळेनुसार सुरू करायची असल्यास, लक्ष्मी रस्त्यावरील इतर गणेश मंडळांना स्वतंत्रपणे सकाळी मिरवणूक सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी. याबाबत लवकरच प्रशासनाकडे अधिकृत मागणी केली जाणार आहे.
या मागणीसंदर्भात आयोजित बैठकीत पुणे शहर गणेशोत्सव समितीचे निमंत्रक संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, निंबाळकर तालीम मंडळाचे सुरेश पवार, हत्ती गणपतीचे श्याम मानकर, साखळीपीर तालीमचे रवींद्र माळवदकर, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, गरुड गणपतीचे सुनील कुंजीर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते आणि इतर अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बालगुडे यांनी प्रास्ताविक सादर करून बैठकीची भूमिका स्पष्ट केली.