पुणे, १३ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल ९४.१० टक्के इतका लागल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.
सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.
राज्यात २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागलेला आहे. मार्च २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के होता. मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के होता. मार्च २४ चा निकाल ९५.८१ टक्के होता. या वर्षीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्यांनी कमी झाली आहेत.