मुंबई, 24 जुलै – ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व सहाय्य मिळावे म्हणून राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सुसज्ज केंद्रांतून अर्ज, समुपदेशन व मार्गदर्शन
या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा, कागदपत्र तपासणी, समुपदेशन, तांत्रिक मदत व शंका निरसन अशा सेवा उपलब्ध असतील. प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता यासाठी ही केंद्रे कार्यरत असतील.
प्रत्येक जिल्ह्यात दोन नामांकित कॉलेजमध्ये केंद्रे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील माहिती पोहोचवणे, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत मदत करणे ही त्यांची प्रमुख भूमिका असेल.
२०२५-२६ पासून अंमलबजावणी
या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहेत, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बैठकेंतून निर्णय
या निर्णयाची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आढावा बैठकीत देण्यात आली. या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, आयुक्त दिलीप सरदेसाई व संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.