नवी दिल्ली , 15 मे (हिं.स.)।कर्नल सोफिया कुरेशीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे मंत्री विजय शाह यांच्यावर देशभरातून टिका केली जात होती.यानंतर आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना चांगलेच सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ‘तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्यं करता?’ असा सवाल विजय शाह यांना विचारला आहे.
विजय शाह यांच्याविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. वादग्रस्त वक्तव्याबद्दल एफआयआर नोंदवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना आता चांगलेच सुनावले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्ही मंत्री आहात. मंत्री असून तुम्ही अशी कोणती भाषा वापरत आहात? हे मंत्र्याला शोभते का? संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या बयानाची अपेक्षा केली जात नाही. जेव्हा देश अशा परिस्थितीतून जात आहे, तेव्हा जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा करता येत नाही.’
मध्यप्रदेशमधील एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. ज्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांनी मंत्री विजय शहांची हकलपट्टी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली.तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी (14 मे) इंदूरमध्ये मंत्री विजय शाह यांचा पुतळा जाळला. शहरातील रिगल चौकात काँग्रेस महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
देशभरातून टीका झाल्यानंतर भाजप मंत्री विजय शहा यांनी आपल्या वक्तव्याबाबत लाज वाटत असल्याचं सांगत माफी मागितली. विजय शाह यांनी म्हटलं आहे की, ‘मी लष्कराचाही अपमान करत नाही. सोफिया कुरेशी यांनी जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशाची सेवा केली आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मी त्यांना सलाम करतो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही सैन्याशी संबंधित आहे. ज्या बहिणींचे सिंदूर दहशतवाद्यांनी नष्ट केले होते त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मी हे विधान केले होते. माझ्या तोंडून काही चुकीचे निघाले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, असे शाह यांनी म्हंटले.
—————