मुंबई : टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याच्यापाठोपाठ सुरेश रैनानेही सोशलमीडियावर माहिती टाकत निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघांनीही एकाच दिवशी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रैना आणि धोनी हे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एकत्र खेळत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताला टी 20 आणि वन डे विश्वचषक मिळवून देणाऱ्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. मात्र आज अचानक धोनीच्या निवृत्तीची घोषणा आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल.
39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018 मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.