मुंबई, 22 मे (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामातील मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सूर्यकुमार यादवच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर प्लेऑफ्ससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात दिल्लीकरांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यंदाच्या हंगामातील १३ व्या सामन्यात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलीये. टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आहे.
टी २० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करताना सलग १३ सामन्यात २५ किंवा त्यापेक्षा धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा टेम्बा बवुमाच्या नावे आहे. सूर्यकुमार यादवने या विक्रमाशी बरोबरी केलीये. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १३ सामन्यात त्याने हा डाव साधलाय. टेम्बा बवुमानं २०१९ ते २०२० या कालावधीत १३ वेळा ही कामगिरी केली होती. सूर्यकुमार यादव क्रिकेट जगतातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एका वर्षात हा डाव साधलाय. सूर्यकुमार यादवनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बवुमाच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. पंजाब किंग्ज विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात २५ धावा केल्या तर तो बवुमाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकतो. तो ज्या फॉर्ममध्ये खेळतोय ते पाहता हा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या टप्प्यात असल्याचे दिसते.
—————