मुंबई, 30 जुलै – अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्तीला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली असून, रियाला या अहवालावर आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
सीबीआयने मार्च 2025 मध्ये आपला तपास अहवाल न्यायालयात सादर केला होता. मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी रियाला 12 ऑगस्टपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी
सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने त्याच्या दोन बहिणी – प्रियांका सिंग आणि मितू सिंग, तसेच डॉ. तरुण नथुराम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या आरोपानुसार, या तिघांनी वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय सुशांतला औषधे दिली होती. या प्रकरणात आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रियाच्या मते, सुशांतला ‘बायपोलार डिसऑर्डर’ असल्याचे निदान झाले होते आणि तो नियमित उपचार घेत नव्हता. अशा स्थितीत बहिणींनी त्याला मेसेजद्वारे औषधे सुचवली होती. या औषधांसाठी वापरण्यात आलेले प्रिस्क्रिप्शन बनावट असल्याचा आरोप तिने केला होता.
प्रकरण पुन्हा चर्चेत
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत झाला होता. मृत्यूची चौकशी सुरु असून, गेली पाच वर्षे हे प्रकरण विविध स्तरांवर चर्चेत राहिले आहे. आता सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आणि त्यावर रियाचा संभाव्य आक्षेप यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.