नवी दिल्ली, 9 जुलै (हिं.स.) :
मुंबई
दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून दिलासा
मिळालेला नाही. आता त्याची न्यायालयीन कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी
६ जून रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली न्यायालयाने तहव्वुर राणाची न्यायालयीन कोठडी
९ जुलैपर्यंत वाढवली होती.
आज न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने
तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश
चंदरजीत सिंह यांनी राणाला त्याच्या पूर्वीच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी
संपल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता या प्रकरणात हा
आदेश दिला. तहव्वुर राणा हा २६/११ हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अमेरिकन नागरिक
डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याचा जवळचा सहकारी आहे. ४ एप्रिल रोजी
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाविरुद्धची पुनर्विचार
याचिका फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले होते.
२६
नोव्हेंबर २००८ रोजी१० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारताच्या आर्थिक राजधानीत
घुसखोरी केली होती. आणि रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर
एकत्रित हल्ला केला होता. तब्बल ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू
झाला होता.