मुंबई, 28 जुलै – “लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळतात, आमदार वेटरला मारतात, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होतात आणि सरकार त्यांना पाठीशी घालते – हे सगळं लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे,” अशी तीव्र टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. जर अशा वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील, तर त्यांना तत्काळ मंत्रिपदावरून हटवावे, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जाण्याचा मार्ग अवलंबू, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यपालांना निवेदन; अनेक गंभीर आरोप
राज्यातील महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांविरोधात शिवसेना (ठाकरे गट) शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध आरोपांसह तक्रारीचे विस्तृत निवेदन सादर केले.
प्रमुख मुद्दे:
-
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात रमी खेळल्याचा आरोप
-
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबाच्या बारमध्ये २२ बार गर्ल सापडल्याची घटना
-
छावा संघटनेचे अध्यक्ष राहुल लोढे यांना आमदार संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण
गंभीर प्रश्न आणि टोले
“राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री झोपलेत का?” असा सवाल करत दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
तसेच, “माणिकराव कोकाटेंना अजित पवार यांचे संरक्षण मिळते आहे. रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर असूनही कोणतीही कारवाई होत नाही. पुढे जाऊन विधानभवनातच पत्त्यांचा संच (कॅट) घेऊन यावा लागेल का?” अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भूमिका
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता विचारल्यावर दानवे म्हणाले, “कोणताही निश्चित प्लान केलेला नाही. पण जर तसे घडले, तर जनतेसाठी ते फायदेशीर ठरेल. आम्ही लोकांच्या न्यायालयात जायचे ठरवले आहे. तेच आमचे खरे रणांगण आहे.”
शिष्टमंडळात अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या शिष्टमंडळात अंबादास दानवे यांच्यासोबत अनिल परब, विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदा फातप्रेकर, विशाखा राऊत, साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, अनंत नर आणि महेश सावंत यांचाही समावेश होता.