पुणे, 30 जुलै – स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल खटल्याच्या पार्श्वभूमीवर, तक्रारदार सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांच्या वकिलांनी केली आहे.
या संदर्भातील अर्ज मंगळवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला. राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाची सीडी व अधिकृत शब्दांकन प्रत तक्रारदारांनी संरक्षण पक्षाला अद्याप न दिल्याचा आरोप ॲड. मिलिंद पवार यांनी केला. त्यांनी सांगितले की, हे वर्तन न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाचे उल्लंघन करणारे आणि न्यायप्रक्रिया अडवणारे आहे.
खटला सुरू होण्याच्या अगोदरच सावरकर यांनी दाखवलेली बेपर्वा भूमिका आणि न्यायालयीन सूचनांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत गंभीर असल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची कारवाई व्हावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या अर्जावर पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.